बारामतीमध्य़े इस्राईल पद्धतीचा डेअरी फार्म
 

 
 

          केवळ गोठ्यातील अयोग्य वातावरणामुळे संकरित गाईचे दहा टक्के दूध उत्पादन घटते, तसेच पारंपरिक व्यवस्थापनातील त्रुटी लक्षात घेऊन ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे इस्राईल पद्धतीचा डेअरी फार्म सुरू करण्यात आला आहे. या फार्ममध्ये ५० गाईंचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.
संकरित गाईची दूध उत्पादनक्षमता आनुवंशिक क्षमतेप्रमाणे मिळविणे व्यावसायिकदृष्ट्या आवश्‍यक असते. आरामदायी आल्हाददायक गोठा, संतुलित आहार व्यवस्थापन, रोगप्रतिबंधक उपाययोजना, संकरित गाईवर येणारे ताण या बाबी दूध उत्पादन घेताना महत्त्वाच्या मानल्या जातात. पारंपरिक व्यवस्थापनातील त्रुटी लक्षात घेऊन इस्राईल पद्धतीचा डेअरी फार्म ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र, शारदानगर, बारामती येथे सुरू करण्यात आला आहे.

या गोठ्याच्या रचनेबाबत केंद्रातील पशुसंवर्धन विषय विशेषज्ञ डॉ. रतन सुखदेव जाधव म्हणाले की, संकरित गाईपासून जास्तीत जास्त दूध मिळविण्यासाठी संकरित गाईच्या गोठ्यातील तापमान २५ ते ३२ अंश से.च्या दरम्यान असणे आवश्‍यक आहे. तसेच सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७० टक्के असावी. गोठ्यामध्ये उत्तम वायुविजन व्यवस्था ही जनावरांची महत्त्वाची गरज आहे. ज्या परिसरामध्ये दोन ते तीन मीटर प्रति सेकंद या वेगाने वारे वाहतात, तेथे नैसर्गिकरीत्या वायुविजनासाठी इस्राईल पद्धतीने गोठे बांधणे आवश्‍यक आहे.

इस्राईलमध्ये उन्हाळ्यामध्ये ४६ ते ५० अंश से. तापमान नोंदविण्यात येते. आपल्याकडे यापेक्षा जास्त तापमानाची निश्‍चितच नोंद होत नाही. तरीसुद्धा इस्राईलमध्ये गाईपासून प्रति वेत सरासरी १२,००० लिटर दूध उत्पादन मिळते. त्यामध्ये शास्त्रीय पद्धतीने गाईची पैदास, आहार व्यवस्थापन, गोठा व्यवस्थापन व रोगप्रतिबंधक उपाययोजना या बाबींचा समावेश होतो.

हे नियोजन योग्य असेल तर निश्‍चितच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये, तसेच राजस्थानमध्येसुद्धा इस्राईल पद्धतीचे गोठे यशस्वी होतील. होल्स्टीन फ्रिजियन गाई विशेषत- थंड प्रदेशातील असल्यामुळे गोठ्यातील वातावरणाचा, उष्णतेचा फार मोठा परिणाम त्यांच्यावर होतो, त्यामुळे आपल्याकडे या गाईंच्या व्यवस्थापनात समस्या जाणवतात.

यामध्ये प्रामुख्याने गाय गाभण न राहणे, माजावर न येणे, कमी दूध उत्पादन, धापा टाकणे अशी कारणे दिसून येतात. आपल्याकडे सर्वच गोठे कोंदट आहेत, त्यामुळे गोठ्यात साठणाऱ्या अमोनिया वायूचा, तसेच उष्णतेचा ताण संकरित गाईवर पडतो; त्यामुळे दूध उत्पादन कमी मिळते.

होल्स्टीन फ्रिजियन गाईंपासून दुग्ध उत्पादन कमी मिळण्याची कारणे
१) समशीतोष्ण कटिबंधातील देशामध्ये संकरित जनावरांना उष्णतेचा त्रास जास्त होतो, त्यामुळे जनावरांची वाढ मंदावते, दूध उत्पादन कमी होते, प्रजननक्षमता कमी होते.
२) शरीरक्रियेमध्ये अडचणी निर्माण करून शरीरामध्ये जास्त उष्णता साठते.
३) संकरित गाईवर उष्णतेचा ताण पडल्यास या गाई जादा उष्णता (पचनक्रियेच्या माध्यमातून) निर्माण करण्याचे थांबवतात आणि उच्छ्वासावाटे उष्णता बाहेर टाकून शारीरिक तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे संकरित गाई धापा टाकतात. श्‍वसनाचा दर वाढतो, त्यामुळे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे दूध उत्पादनात घट येते.

आधुनिक गोठ्याची रचना -
गोठ्यातील रचना, खाद्य खाताना उभी राहण्याची जागा, पाण्याची चोवीस तास उपलब्धता आणि मलमूत्राचा निचरा, गाई स्वच्छ करण्याची व्यवस्था, दूध काढण्याचे तंत्र इत्यादी बाबींचा विचार आधुनिक गोठा तयार करण्यामध्ये केलेला आहे.

पारंपरिक गोठ्यात उष्णता आणि गोठ्यामध्ये अमोनिया वायू साठल्याने संकरित गाईवर ताण पडतो, अशा प्रकारे ताण कमी करण्यासाठी गोठा थंड, हवेशीर आहे. गोठ्यातील कामे सुलभपणे कमी वेळात करण्यासाठी गोठ्याची रचना केली आहे. उदा. - गाईला खाद्य देण्यासाठी शेण, मलमूत्र काढण्यासाठी, गाईची स्वच्छता तसेच धारा काढणे या कारणांसाठी गोठा स्वच्छतेसाठी सुलभ आणि संकरित गाईंना आरामदायी होईल, अशा पद्धतीची रचना केली आहे. हे लक्षात घेऊन प्रक्षेत्रावर गोठा बांधण्यापूर्वी संपूर्ण डेअरी फार्मचा आराखडा तयार करण्यात आला होता.

गाईंचे विविध गट -
या गोठ्यात गाईच्या उत्पादनक्षमतेप्रमाणे गट करण्यात आले आहे. त्यामध्ये १) नुकत्याच विलेल्या गाईंचा गट, २) विल्यानंतर ३ महिने झालेल्या गाईंचा गट, ३) गाभण गाईंचा गट (आटवलेल्या गाईंचा गट), ४) कालवडीचा गट तयार केले आहेत. अशा प्रकारचे गट केल्यामुळे आहार व्यवस्थापन त्यांच्या गरजाप्रमाणे करणे शक्‍य होते.

"
टीएमआर'नुसार आहार व्यवस्थापन -
आहार व्यवस्थापन सोईस्कर व्हावे म्हणून काही दिवसामध्येच "टीएमआर' (टोटल मिक्‍स्ड रेशन) पद्धत वापरण्यास सुरवात करण्यात येणार आहे. "टीएमआर' म्हणजे जनावरांना हिरवा चारा, वाळलेला चारा, पशुखाद्य आणि खनिजद्रव्यांचे योग्य मिश्रण एकत्र मिसळून देणे. ज्या वेळेस गाई दूध उत्पादनापेक्षा जास्त "टीएमआर' खाऊ लागतात, त्या वेळेस त्यातील चाऱ्याचे प्रमाण वाढवता येते.

१) जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गाईच्या टीएमआरमध्ये ६० चारा अधिक ४० टक्के पशुखाद्य देण्यात येते. दूध उत्पादनक्षमतेप्रमाणे हे प्रमाण कमी-जास्त करावे लागते.
२) "टीएमआर' खाताना प्रत्येक वेळी पशुखाद्य तंतुमय पदार्थ (चारा) खनिज द्रव्ये जीवनसत्त्वे कोठी पोटामध्ये जातात. त्यामुळे कोठी पोटाचा सामू नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे दूध उत्पादन आणि फॅटचे प्रमाण योग्य ठेवणे शक्‍य होते.
३) "टीएमआर' वेगवेगळ्या गटासाठी तज्ज्ञ व्यक्तीकडून बनवून घेणे आवश्‍यक आहे. उदा. - गाभण गाईंना मीठ देऊ नये. कालवडीची उत्तम वाढ होण्यासाठी "काफ स्टार्टर' वापरण्यात येते.
उत्तम कालवडी निर्माण करण्यासाठी सिद्धवळूचे सिमेन वापरले आहे.
गाईंना २४ तास स्वच्छ, थंड पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अशा प्रकारची व्यवस्था ५० ते १०० गाई सांभाळण्याची क्षमता असणाऱ्या शेतकऱ्यांना करणे शक्‍य आहे. अशा दुधापासून उत्तम प्रतीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनविणे शक्‍य आहे.

इस्राईल पद्धतीच्या डेअरी फार्मची वैशिष्ट्ये -
गोठ्यामध्ये गाईंना खाद्य देणे, शेण एकाठिकाणी जमा करणे, गोठ्यापासून शेणाची वाहतूक गांडूळ खत शेडपर्यंत करणे ही कामे ट्रॅक्‍टरने करता येण्यासाठी रस्त्यांची व्यवस्था आहे.

गोठ्यातील मलमूत्र व्यवस्थित वाहून जाण्यासाठी भूमिगत गटारे (ड्रेनेज लाइन) आहेत; तसेच गोठ्यातील सांडपाणी, मलमूत्र आणि मिल्क पार्लर आणि गाई स्वच्छ धुतल्यानंतरचे पाणी थेट स्लरी टॅंकमध्ये सोडण्यात आले आहे. गोठ्यात वापरलेले सर्व पाणी जमा करून पुन्हा शेतीसाठी वापरणे शक्‍य झाले आहे.

गोठ्यामध्ये धारा काढण्यापूर्वी गाईची स्वच्छता, तसेच गाईंना थंड करणे महत्त्वाचे आहे; म्हणून धारा काढण्यापूर्वी शॉवरच्या साह्याने गाई धुण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. गाई स्वच्छ धुतल्यानंतर अंगावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी स्वतंत्रपणे "होल्डिंग एरिया' आहे.

गाईंना बसण्यासाठी आरामदायी पाचटाची गादी आहे, त्यामुळे पाचटामध्ये मलमूत्रातील पाण्याचा अंश शोषून घेतला जातो. गाईंच्या खुरामुळे पाचटाचे तुकडे होतात, त्यामुळे पाचटापासून उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत, गांडूळ खत बनविता येते. गोठ्यातील पाचटयुक्त शेणाची गादी पावसाळ्यामध्ये दर महिन्यातून एकदा उचलली जाते. उन्हाळ्यामध्ये दर तीन ते चार महिन्यांतून एकदा उचलली जाते.

गाईच्या धारा काढण्यासाठी "हेरिंग बोन टाइप' मिल्क पार्लर उभारण्यात आले आहे. एका वेळेस सहा गाईंच्या धारा काढण्याची व्यवस्था आहे. गाईच्या धारा काढल्यानंतर दूध काचेच्या जारमध्ये जमा होते. त्यानंतर बल्क कुलरमध्ये दूध जमा केले जाते. बल्क कुलरमध्ये चार अंश. से. तापमानापर्यंत दोन तासामध्ये दूध थंड केले जाते. त्यामुळे जिवाणूची संख्या वाढत नाही. या पद्धतीनुसार दीड तासामध्ये ५० गाईंच्या धारा एक व्यक्ती काढू शकते. धारा काढल्यानंतर "मिल्किंग सिस्टिम' गरम पाण्याने धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गरम पाण्यासाठी फार्मवर सोलर वॉटर हिटर बसविण्यात आला आहे. दुधाला मानवी हाताचा स्पर्श होणार नाही, याची सर्व काळजी घेण्यात आली आहे.

गोठ्यातील मलमूत्र स्लरीतील पाणी गाळून शेतीसाठी वापरण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. सदर पाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देता येते.

खाद्य खाताना गाईची उभी राहण्याची जागा पेव्हिंग ब्लॉकचा वापर करून बनविण्यात आली आहे. त्यामुळे तेथे भेगा पडत नाहीत. या जागेला "फिडिंग लाइन' असे म्हणतात. यामध्ये पडणारे शेण ट्रॅक्‍टर फरांडीने काढणे शक्‍य होते.

ट्रॅक्‍टरने खाद्य देण्यासाठी गोठ्याच्या मध्यभागी रस्ता आहे. त्याला "फिडिंग टेबल' म्हणतात. फिडिंग टेबलच्या मध्यभागी ट्रॅक्‍टर चालवून दोन्ही बाजूंच्या गाईंना खाद्य देता येते, त्यामुळे खाद्य देण्यासाठी वेळ कमी लागतो. गाईंना दिवसातून दोन ते तीन वेळा खाद्य द्यावे लागते. या सुधारित तंत्रज्ञानामुळे एक तासाचे काम पंधरा मिनिटात होते.

 

 

 

 


----------------------------------------------------------------------
संपर्क - डॉ. रतन सुखदेव जाधव
विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन
कृषी विज्ञान केंद्र, शारदानगर, बारामती
दूरध्वनी क्र. - ०२११२- २५५२०७,
मो. - ९९२२४१४८०६.